राम मंदिर ते तांबेपुरा रस्त्याची दुर्दशा; उद्घाटनाला सहा महिने उलटले तरीही खड्ड्यांचे साम्राज्य..


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर -राम मंदिर ते तांबेपुरा या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. अवकाळी पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याचे उद्घाटन आमदारांच्या हस्ते थाटात झाले होते आणि त्याला आता फक्त सहा महिनेच झाले आहेत.
वार्ड क्रमांक एक मधील स्थानिक नागरिकांच्या मते, अवकाळी पावसातच ही अवस्था झाली असल्यास खरी पावसाळी स्थिती काय भयंकर असेल याची चिंता निर्माण झाली आहे.
स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. नागरिकांचा सवाल आहे की, उद्घाटनाच्या झगमगाटानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आता दुर्लक्ष का केले आहे?
या रस्त्याची त्वरित डागडुजी करून रहदारीस सुरळीत मार्ग मिळावा, अशी जोरदार मागणी सध्या होत आहे.