पालिकेच्या भूखंड १२३ वरील ३८ अतिक्रमणांवर कारवाई सुरूकाहींनी दुकाने स्वखुशीने हटवली; भाजीपाला मार्केटकडे जाणारा मार्ग मोकळा..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : पालिकेच्या मालकीच्या भूखंड क्रमांक १२३ मधील मुख्य रस्त्यालगत केलेल्या ३८ अतिक्रमणांवर अखेर कारवाईला सुरुवात झाली आहे. पालिकेच्या कारवाईचे पाहता काही दुकानदारांनी स्वतःहून दुकाने हटवली असून, त्यामुळे भाजीपाला मार्केटकडे जाणारा मुख्य मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांनी पालिकेच्या या पावलाचे स्वागत केले आहे.
या भूखंडावर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाल्याने मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. भाजीपाला, किराणा व इतर दैनंदिन वस्तू खरेदीसाठी जाताना वाहतूक कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने १२३ भूखंडात ८६ व्यापारी गाळे बांधून अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापैकी ३८ दुकानदारांनी आपली दुकाने तात्पुरत्या स्वरूपात जैसे थेच ठेवली होती.
प्रचंड वाहतुकीच्या त्रासामुळे पालिकेने अलीकडेच या दुकानदारांना नोटीस पाठवल्या. तरीही अतिक्रमण न हटवल्याने चार दिवसांपूर्वी तोंडी सूचना देण्यात आल्या. अखेर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या नेतृत्वाखाली अभियंता डिगंबर वाघ, अतिक्रमण निरीक्षक अविनाश बिन्हाडे, जितू चावरीया, विशाल सपकाळे, सुनील संगेले, बुद्धाभूषण चव्हाण, जतीन चव्हाण, कमलेश पाटील व विकास बिन्हाडे यांच्या पथकाने दोन जेसीबी मशीनसह सकाळी कारवाई सुरू केली.
ही कारवाई सुरू होताच दुकानदारांनी स्वतःहून दुकाने रिकामी करत पत्रे व अँगल काढण्यास सुरुवात केली. सायंकाळी पालिकेने पक्के ओटे व बांधकाम पूर्णपणे हटवून जागा साफ केली.
शहराच्या वाढत्या विस्तारामुळे वाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी पालिकेने गांधीनगर झामी चौक आणि भूखंड १२३ मधील अतिक्रमणे हटवली. या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी पालिकेने दक्षता घ्यावी, अशी मागणीही नागरिक करत आहेत.