अमळनेर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे ‘भिक्षांदेही आंदोलन’; दोन महिन्यांपासून वेतन नाही.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर नगरपरिषदेमधील कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून वेतनाविना हवालदिल झाले असून, त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून वेतनासाठी निधी उपलब्ध न झाल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. गृहकर्ज व विमा हप्ते थकीत झाले असून, दैनंदिन गरजांसाठी कर्मचाऱ्यांना सावकारांकडे हात पसरावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटना (नाशिक विभाग) तर्फे १२ मे २०२५ रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संत सखाराम महाराज यात्रेत “भिक्षांदेही” आंदोलन जाहीर करण्यात आले आहे. आंदोलनातून गोळा झालेली रक्कम शासनाकडे वेतनासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संघटनेचे अध्यक्ष श्री. सोमचंद संदानशिव यांनी हा निर्णय सामाजिक बांधिलकीतून घेतला असून, या अनोख्या आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.