आज मॉक ड्रिल !राज्यात १६ नागरी संरक्षण जिल्हे..

24 प्राईम न्यूज 7 May 2025

भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात नागरिकांना युद्धजन्य किंवा हवाई हल्ल्यांमधील आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्ज ठेवण्यासाठी ‘सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल’ आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज बुधवारी देशभरात ही मॉक ड्रिल होईल. मंगळवारी गृह मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकीत ड्रिलच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. राज्यांचे मुख्य सचिव आणि लष्कर प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी त्यात उपस्थित होते. यानंतर मॉक ड्रिल घेण्यात येणाऱ्या नागरी संरक्षण जिल्ह्यांची यादी गृह मंत्रालयाने जाहीर केली. यामध्ये, राज्यनिहाय संवेदनशीलतेच्या आधारावर देशातील २५ राज्यांमधील एकूण २४४ नागरी संरक्षण जिल्ह्यांना श्रेणी-१ ते ३ दरम्यान विभागण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १६ संरक्षण जिल्ह्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात मंगळवारी सुमारे ४० मिनिटे बैठक झाली. या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात आली.
महाराष्ट्रात कुठे होणार मॉक ड्रिल ?
मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, धाटाव, नागोठाणे, थळ वायशेत (रायगड जिल्हा), पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
नाशिक जिल्ह्यात ३ ठिकाणी मॉक ड्रिल
नाशिक शहरातील लष्करी छावणी, करन्सी नोट प्रेस, सिन्नर लष्करी छावण्या, मनमाडला पेट्रोलियम डेपो असल्यामुळे ३ ठिकाणी मॉक ड्रिल होईल.मॉक ड्रिलमधील प्रशिक्षण
हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजतील. देशात अचानक वीजपुरवठा खंडित होईल.
शाळा, कार्यालये आणि कम्युनिटी सेंटर्समध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जातील. ड्रॉप अँड कव्हर तंत्र (कान वाकवून झाकणे), जवळचा निवारा शोधणे, प्रथमोपचार देणे आणि तणावाच्या काळात शांत राहणे हे शिकवले जाईल.
कॅमोफ्लाज एक्सरसाईज: लष्करी तळ, संसद, विधिमंडळ,
मोबाईल टॉवर, वीज प्रकल्प आदी इमारती आणि आस्थापनांना झाकले जाईल. नागरिकांना घरात मेडिकल किट, अन्नधान्य, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याच्या सूचना देखील दिल्या जातील.
आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल, डिजिटल व्यवहार अयशस्वी होऊ शकतात रोख रक्कम बाळगण्याच्याही सूचना दिल्या जातील.