अमळनेर उपविभागीय कार्यालयाला राज्यस्तरीय सन्मान – जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची आघाडी

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत झालेल्या मूल्यमापनामध्ये अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत मानाचा ठसा उमटवला आहे.
या यशामागे उपविभागीय अधिकारी मा. नितीनकुमार मुंडावरे आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचे मोलाचे योगदान असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
या मूल्यमापनात कार्यक्षमता, पारदर्शकता, वेळेत सेवा वितरण, कार्यालयीन सुव्यवस्था आणि नागरिकाभिमुख सेवा अशा विविध निकषांचा समावेश करण्यात आला होता. अमळनेर उपविभागीय कार्यालयाने या सर्व निकषांवर उज्वल कामगिरी करत ७७.५८ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
हा सन्मान प्रशासनातील सकारात्मक बदल, समर्पित कार्यपद्धती आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोनाचे प्रतिक असून, संपूर्ण अमळनेर तालुक्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे.