भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय: आयपीएल किमान आठवडाभर स्थगित..

0


24 प्राईम न्यूज 10 May 2025


इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा १८वा हंगाम किमान पुढील आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतला आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, देशातील सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून बीसीसीआयने पाऊल उचलले आहे. पुढील आठवडाभर देशातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव देवजीत साइकिया यांनी स्पष्ट केले.

२२ मार्चपासून सुरू झालेल्या आयपीएलचा ५८वा सामना गुरुवारी (८ मे) धरमशाला येथे पंजाब आणि दिल्ली संघांमध्ये खेळवला जात होता. मात्र पंजाब आणि जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे सामना मध्यातच थांबवण्यात आला.

धरमशालामध्ये संपूर्ण ब्लॅक आऊट करण्यात आले आणि स्टेडियममधील प्रकाश व्यवस्था ठप्प झाली. चारही लाइट टॉवर बंद झाल्यानंतर प्रेक्षकांना बाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले. बीसीसीआय आणि सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात घेतली. खेळाडू, समालोचक, व इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचे प्राण गेले होते. त्यानंतर भारताने ६ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत प्रत्युत्तर देत ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैन्याने ते हाणून पाडले.

बीसीसीआयने शुक्रवारी अधिकृतपणे संपूर्ण स्पर्धा किमान आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात बीसीसीआय सचिव देवजीत साइकिया म्हणाले, “देशातील सद्यस्थिती पाहता आयपीएलचा उर्वरित हंगाम एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुढील काही दिवसांत स्थिती पाहून स्पर्धेच्या आयोजनाचा आणि स्थळांचा निर्णय घेतला जाईल. सर्व संघमालकांनी एकमताने या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!