भुसावळात दिवसाढवळ्या वृद्धावर हल्ला; बँकेतून पैसे काढल्यानंतर लुटमार..


24 प्राईम न्यूज 11 May 2025
भुसावळ – बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या एका ७७ वर्षीय वृद्धावर पाळत ठेवून आलेल्या संशयिताने हल्ला करत रोकड लुटल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरातील कृष्णलीला हॉटेलजवळ शुक्रवारी दुपारी घडली. रमजान शहा बुढन शहा (वय ७७, रा. मुस्लिम कॉलनी) असे जखमी वृद्धाचे नाव असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमजान शहा हे मुस्लिम कॉलनीतील रहिवासी असून, ते मशिदीत अजान देण्याचे काम करतात. त्यांना यासाठी संस्थेकडून दरमहा पाच हजार रुपयांचे मानधन मिळते. शुक्रवारी त्यांनी दोन हजार रुपये रोख रक्कम घेऊन बाजारात खरेदीसाठी निघाले होते. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आनंद नगर शाखेतून त्यांनी तीन हजार रुपये पेंशन काढून पासबुकमध्ये जमा केली.
दुपारी सुमारास बँकेबाहेर पडल्यावर एक संशयित सतत त्यांचा पाठलाग करीत होता. कृष्णलीला हॉटेलजवळ आल्यानंतर त्या संशयिताने वृद्ध रमजान शहा यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेतली आणि “किसी को बताया, तो मार डालूंगा” अशी धमकी देत घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेदरम्यान काही नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने त्यांनाही धमकावले.
ही घटना भरदिवसा घडल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाजारपेठ पोलीस तपासात गुंतले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
