रेल्वेत एक महिन्याच्या बाळाला सोडून आई-वडील पसार. — पोलिसांसमोर शोधाचे मोठे आव्हान.

आबिद शेख/ अमळनेर

भुसावळ-सुरत पॅसेंजरमध्ये अवघ्या एका महिन्याच्या बाळाला सोडून आई-वडील पसार झाल्याची धक्कादायक घटना ९ मे रोजी रात्री घडली. धरणगाव स्थानकावर सर्वसाधारण डब्यात चढलेले हे जोडपे बाळाला घेऊन प्रवास करत होते. त्यांनी रेल्वे डब्यातच बाळासाठी झोका बांधला होता. मात्र, अमळनेर स्थानक आल्यानंतर दोघेही आई-वडील बाळाला झोक्यातच सोडून गुपचूप उतरून निघून गेले.

रेल्वे पुढे दोंडाईचा स्थानकावर गेल्यानंतर काही प्रवाशांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलीस कर्मचारी अनिता चौधरी आणि अलका अढाळे यांनी बाळाला नंदूरबार स्थानकावर उतरवून तात्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अमळनेर स्थानकावर तसेच धरणगाव स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने संबंधित जोडपे कोण होते, याचा शोध लावण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे बाळाचे आई-वडील कोण हे ओळखणे आणि त्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
