धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसला पडणार खिंडार!माजी आमदार कुणाल पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर?

मुंबईत अजित पवारांची भेट घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती;
धुळे ग्रामीणमधील राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता.

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
24 प्राईम न्यूज 14 May 2025
धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस पक्षाला लवकरच मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

कुणाल पाटील हे स्व. रोहिदास पाटील यांचे पुत्र असून, २०१४ ते २०२४ या कालावधीत सलग दोन टर्म आमदार राहिले आहेत. मोदी लाटेतही त्यांनी धुळे ग्रामीणवर आपले वर्चस्व टिकवले होते. स्थानिक पातळीवर रस्त्यांच्या कामांसह विविध विकास योजनांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला होता. विधानसभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही सातत्याने आवाज उठवला होता.
अलीकडील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, तरी काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून त्यांची सक्रिय भूमिका सुरू आहे. मात्र, त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा मागील निवडणूक काळातच सुरू झाल्या होत्या. त्या वेळी त्यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहून निवडणूक लढवली होती.
नवीन घडामोडींनुसार, कुणाल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून, यासंदर्भात अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुंबईत पोहोचले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आज त्यांच्या भेटीची वेळ निश्चित झाली आहे.
धुळे जिल्ह्यात माजी आमदार शरद पाटील, उद्योजक सचिन दहिते, डॉ. मनोज महाजन, डॉ. अमृता महाजन यांनी देखील नुकताच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या भागातील राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.
कुणाल पाटील यांचा पक्षप्रवेश झाला, तर धुळे ग्रामीणमधील राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. कट्टर विरोधक एकत्र येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तूर्त सर्वांचे लक्ष त्यांच्या मुंबईतील हालचालींकडे लागले आहे.