राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा… धनदाई कला व विज्ञान महािद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा काळ्या फिती लावून लाक्षणिक उपोषण….

अमळनेर (प्रतिनिधि ) येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काळया फिती लावून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. संपूर्ण राज्यभर चालू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्वरित मागण्या मंजूर कराव्या असे आव्हान यानिमित्ताने करण्यात आले.
“राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला असून केवळ विद्यापीठ क्षेत्रातील शिक्षकेतर कर्मचारी यापासून वंचित आहेत. हे न्यायाला धरून नाही. त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बढती बाबतचे धोरण सुसंगत नाही .शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद असल्याने अपूर्ण मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. यामुळे सातवा वेतन आयोग लागू करावा, भरतीस मान्यता द्यावी व सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन” असल्याची माहिती शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रमुख कैलास अहिरे यांनी दिली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या संपास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रमोद पवार, संस्थेचे अध्यक्ष डी. डी. पाटील, सी.डी. सी. चेअरमन के. डी. पाटील, संचालक शैलेंद्र पाटील यासह सर्व संचालक मंडळाने तसेच एन. मुकटो प्राध्यापक संघटनेने देखील पाठिंबा जाहीर केला.
‘आज केलेल्या लाक्षणिक उपोषणाअंती कुठलेही ठोस लेखी आश्वासन न मिळाल्यास दिनांक 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संप पुकारण्यात येईल व आंदोलन तीव्र करण्यात येणार’ असल्याची माहिती एस.बी. गिरासे व विष्णू शेटे यांनी दिली या लाक्षणिक उपोषणात सयाजीराव कापडणेकर, दगडू पाटील, नारायण पाटील, राजेंद्र पाटील, विवेक पवार, किशोर पाटील, शुभम मालपुरे आदींनी सहभाग घेतला तर पाठिंबा देण्यासाठी एन.मुकटो. संघटनेचे डॉ. लीलाधर पाटील व डॉ. जयवंतराव पाटील हे उपस्थित होते.