“दुकान द्या, अतिक्रमण काढू!” — अमळनेर शहर व्यावसायिक संघटनेचे आंदोलन सुरु..

0

आबिद शेख/अमळनेर



अमळनेर शहरातील भागवत रोड, शिवाजी रोड, टिळक रोड आणि जुन्या आठवडे बाजार परिसरात गेली 27 वर्षे टपऱ्यांमधून व्यवसाय करणाऱ्या लघु व्यावसायिकांना अखेर आपल्या हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.

1998 मध्ये नगर परिषदेने अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान टपरी धारकांना भूखंड क्रमांक 123 अ व ब मध्ये दुकाने देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. यासंदर्भात 22 जून 1998 रोजी टपरी धारकांनी उपोषण मागे घेतले होते. त्यानंतर 1999 मध्ये जाहीर नोटीस काढून 160 दुकाने भाडेपट्ट्याने देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.

त्यावेळी सुमारे 120 टपरी धारकांनी दहा हजार रुपयांचा पहिला हप्ता भरला होता. मात्र आजतागायत नगर परिषदेकडून निश्चीत वेळापत्रक किंवा पुढील टप्प्याची माहिती दिली गेलेली नाही.

2004 मध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले होते. नगर परिषदेने देखील ठराव क्रमांक 104 मंजूर केला होता.

परंतु आज 27 वर्षे उलटून गेल्यानंतरही टपरी धारकांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे अमळनेर शहर व्यावसायिक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असून, 20 मे 2025 पासून “दुकान द्या, अतिक्रमण काढू!” या घोषवाक्याखाली मोर्चाला सुरुवात झाली आहे.

संघटनेचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार व सचिव पदमेश सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे की, टपरी धारकांची अधिकृत यादी न. प. कडे असून, त्यांना प्राधान्याने दुकाने दिल्यास ते स्वतःहून अतिक्रमण हटवतील. त्यामुळे अमळनेर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल.

त्याचबरोबर त्यांनी जाहीर लिलाव पद्धतीला विरोध दर्शवला आहे. “लिलावात गरीब टपरीवाले टिकणार नाहीत, त्यामुळे अन्याय टाळण्यासाठी टपरी धारकांना प्रथम दुकानं द्या,” असा ठाम आग्रह संघटनेने व्यक्त केला आहे.

अमळनेर शहरातील नागरिकांनी या शांततेच्या व लोकशाही मार्गाने चालणाऱ्या न्यायाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!