अमळनेरात भव्य तिरंगा रॅलीने देशभक्तीचे स्फुरण; शिवसेनेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर: भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करत, राष्ट्रप्रेम जागविणाऱ्या भव्य तिरंगा रॅलीमुळे अमळनेर शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. शिवसेना आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने २१ मे रोजी आयोजित या रॅलीने शहरात नवचैतन्य निर्माण केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळी ९ वाजता तिरंगा चौकातून राज्यगीताने रॅलीची भव्य सुरुवात झाली. तालुका प्रमुख सुरेश अर्जून पाटील, शहर प्रमुख संजय कौतिक पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या हस्ते माजी सैनिक आणि शहीद जवान विलास पाटील यांच्या पत्नी छाया पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
रॅलीदरम्यान नागरिकांच्या हाती तिरंगे फडकत होते. ओपन जिप्सीवर माजी सैनिकांनी तिरंगा हाती घेत रॅलीचे नेतृत्व केले. देशभक्तिपर गीतांनी संपूर्ण परिसर उत्साहाने भरून गेला.
तिरंगा चौकातून निघालेली रॅली महाराणा प्रताप चौकात राष्ट्रगीताने समाप्त झाली. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या रॅलीमध्ये अनेक मान्यवर व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन दिलीप बहिरम यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष चौधरी यांनी मानले.