४० हजार रुपयांसाठी देशाशी गद्दारी. – पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक.

24 प्राईम न्यूज 25 May 2025

गुजरातमधील कच्छ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव सहदेव सिंह गोहिल असे असून तो एक आरोग्य कर्मचारी आहे.

एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहदेव सिंह गेल्या वर्षी जून-जुलै २०२३ पासून ‘अदिती भारद्वाज’ नावाच्या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होता. दोघांमध्ये व्हॉट्सअॅपवर संवाद सुरू होता. जानेवारी २०२५ मध्ये सहदेवने आपल्या आधार कार्डचा वापर करून भारतीय सिमकार्ड घेतले व फेब्रुवारी २०२५ मध्ये हे सिम अदिती भारद्वाजला OTPच्या माध्यमातून दिले. यावरून दोघांमध्ये व्हॉट्सअॅप कॉल व मेसेजिंग सुरू झाले होते.
सहदेवने भारतीय सीमा, बीएसएफ आणि नौदलाच्या हालचाली, परिसराचे फोटो आणि इतर संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवली होती. या बदल्यात त्याला सुमारे ४०,००० रुपयांची रक्कम मिळाल्याचे उघड झाले आहे. तो पाकिस्तानसाठी कंत्राटी पद्धतीने काम करत होता.
सध्या सहदेवचा मोबाईल फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये तपासासाठी पाठवण्यात आला आहे, जिथे त्याचे लोकेशन, चॅटिंग आणि मीडिया फायलींचे विश्लेषण केले जाणार आहे.
गुजरात एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या हेरगिरी नेटवर्कमध्ये आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरक्षा यंत्रणा आता कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी करत आहेत.