अमळनेरचे हेडकॉन्स्टेबल सुनील महाजन स्वेच्छानिवृत्त; आता समाजसेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाला वाहणार आयुष्य..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : पोलीस खात्यातील २० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अमळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हेडकॉन्स्टेबल सुनील दयाराम महाजन यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. पोलीस खात्यातील ताणतणावामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून, निवृत्तीनंतर समाजसेवा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी आपले आयुष्य समर्पित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाजन २००४ साली पोलीस सेवेत रुजू झाले होते. ते इतिहास, इंग्रजी आणि जनरल अशा तीन विषयांचे पदवीधर असून, एम.ए., बी.एड., नेट, सेट आणि पेट अशा परीक्षाही त्यांनी यशस्वीपणे पार केल्या आहेत. त्यांना लिखाणाचीही विशेष आवड असून सामाजिक विषयांवर लेखन करण्याचा त्यांचा मानस आहे.
२४ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी कुटुंबासह पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छा निवृत्तीची विनंती केली होती. या विनंतीला मान देत, २ जून २०२५ पासून त्यांची निवृत्ती मान्य करण्यात आली आहे.
निवृत्तीनंतर महाजन समाजातील मानसिक रुग्ण, निराधार, वृद्ध, महिलावर्ग व अनाथांसाठी कार्य करणार आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ते मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहेत. त्यांच्या नव्या वाटचालीसाठी अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.