अमळनेर शहरातील ११० सीसीटीव्ही कॅमेरे आता थेट पोलीस स्टेशनच्या नियंत्रणाखाली..

0


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरात लावण्यात आलेले ११० सीसीटीव्ही कॅमेरे आता थेट पोलीस स्टेशनच्या विशेष नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे शहरातील कोणतीही घटना घडल्यास पोलिसांना त्वरित फुटेज मिळू शकणार असून, तपास प्रक्रियाही अधिक जलद आणि अचूक होणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.

यापूर्वी शहरातील कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी खासगी डिव्हीआरवर आधारित होते. त्यामुळे वेळोवेळी फुटेज मिळवण्यात अडचणी येत होत्या. अनेकदा डिव्हीआर खराब असणे, कॅमेरे बंद असणे यामुळे तपासात विलंब होत होता. नागरिकांनी एकदाच खर्च केला की पुन्हा दुरुस्तीला हात लावत नसत. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला.

आता शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवरील सर्व कॅमेरे ऑप्टिकल फायबरद्वारे पोलीस स्टेशनला जोडले जाणार आहेत. विशेष म्हणजे, पुढे कॅमेरे बंद पडल्यास त्यांची देखभाल व दुरुस्ती पोलीस विभागच करणार आहे.

“पोलीस स्टेशनमधून थेट नियंत्रण असल्यामुळे गुन्हेगार कोणत्या दिशेने गेला हे समजेल आणि तपास यंत्रणा त्वरित कार्यरत होईल.”
– दत्तात्रय निकम, पो.नि. अमळनेर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!