अमळनेरात MIDC स्थापन करण्याची आमदार अनिल पाटील यांची उद्योग मंत्र्यांकडे मागणी..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा.ना. श्री. उदय सामंत यांच्याकडे अमळनेरात MIDC (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) स्थापन करण्याची मागणी केली आहे.

या मागणीसाठी पाठवलेल्या पत्रात आमदार पाटील यांनी नमूद केले आहे की, अमळनेर हा जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती भागात असून येथील नागरिक मुख्यतः शेतीवर अवलंबून आहेत. परंतु हा तालुका अवर्षणप्रवण असल्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक अडचणींना सामोरे जावे लागते.
मतदारसंघात कुठलाही साखर कारखाना अथवा मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे स्थानिक युवक व युवती मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या शोधात गुजरात व मध्य प्रदेशात स्थलांतर करत आहेत. अशा परिस्थितीत अमळनेर येथे MIDC स्थापन झाल्यास, स्थानिक तरुणांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
पाटील यांनी हे देखील नमूद केले की, अमळनेरच्या आसपासच्या परिसरात दळणवळणाची सुविधा चांगली आहे – रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग तसेच पाण्याचा स्रोत म्हणून निम्न तापी प्रकल्प (पाडळसे धरण) प्रगतिपथावर आहे. त्यामुळे उद्योजकांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा सहज उपलब्ध होतील.
त्यानुसार, आमदार अनिल पाटील यांनी उद्योग विभागाने तातडीने आवश्यक पावले उचलून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.