जळगावातील ४४९ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अयोग्य घोषित; कारवाईसाठी एकता संघटनेची मागणी..

0

24 प्राईम न्यूज 29 May 2025


– शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय चौकशी समितीने जळगाव जिल्ह्यातील तब्बल ४४९ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अयोग्य ठरवले आहे. यासंदर्भात आयुक्त, शिक्षण विभाग पुणे यांच्या आदेशानुसार उपसंचालक शिक्षण विभाग नाशिक यांनी संबंधितांची प्रत्यक्ष सुनावणी घेऊन आपला अहवाल सादर केला. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने एकता संघटना आक्रमक झाली असून कारवाईची मागणी लावून धरली आहे.

२७ मे २०२५ रोजी मंत्रालयातून आलेल्या एका ईमेलद्वारे समक्ष सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे संबंधित प्रकरण पुन्हा रखडल्याचे दिसत आहे.

“अयोग्य” कर्मचारी अद्याप सेवेत, शासनाची फसवणूक – एकता संघटना

राज्यस्तरीय समितीच्या अहवालात अयोग्य ठरलेले ४४९ कर्मचारी अद्यापही विविध शाळांमध्ये कार्यरत असून शासनाकडून लाखो रुपयांचा पगार घेत आहेत. “एकाच जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने अयोग्य कर्मचारी असूनही कारवाई होत नसल्याने शासनाची फसवणूक होत आहे,” असा आरोप एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी केला.

फारूक शेख यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्ष प्रमुख यांना याबाबत लेखी तक्रार देत त्वरीत कारवाईची मागणी केली आहे. याबरोबरच तक्रारीच्या प्रती शिक्षणमंत्री, आयुक्त, संचालक आणि उपसंचालक यांनाही देण्यात आल्या आहेत.

जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

या प्रकरणात अद्याप कारवाई न झाल्यास शासनाच्या लाखो रुपयांच्या नुकसानीस जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत फारुक शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

शिक्षण अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना तक्रारी

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालयीन दौऱ्यावर असल्याने तक्रार अर्ज शिक्षण अधिकारी माध्यमिक कल्पना चव्हाण यांना नदीम मलिक यांनी सादर केला. तसेच अप्पर जिल्हा दंडाधिकारी गजेंद्र पाटोळे यांना अनिस शहा यांनी तक्रार सादर केली. यावेळी एकता संघटनेच्या शिष्टमंडळातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

एकता संघटनेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित :

फारुक शेख, नदीम मलिक, अनिश शहा, अनवर शिकलगर, सय्यद इरफान अली, नजमुद्दीन शेख, मुजफ्फर खान, वसीम रियाज, तौसीफ शेख आदी.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!