“आम्ही एकत्र असतोच” – अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर खुलासा.


24 प्राईम न्यूज 3 Jun 2025
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे नेते शरद पवार विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत असून, त्यांच्या या भेटींमुळे पुन्हा एकदा दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “माझ्या मुलाच्या साखरपुड्याला शरद पवार कुटुंब उपस्थित होतं. घरातील कार्यक्रम असतील तर आम्ही कुटुंब म्हणून एकत्र येतोच. आमची राजकीय विचारधारा वेगळी असली, तरी सुख-दुःखात आम्ही एकत्र असतो.”
त्याचबरोबर, विरोधकांकडून सरकारी यंत्रणेच्या गैरवापराच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “इथे सरकारी यंत्रणा वापरल्याचे दिसतेय का? वापरली असेल तर दाखवा. तुम्ही उणीदुणी काढली, तर मी तुम्हाला सोडणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे शरद पवार, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एका कार्यक्रमात एकत्र उपस्थित होते. कार्यक्रमात साखर उद्योग आणि कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापराबाबत चर्चा झाली. यावेळी तीन नेत्यांमध्ये बंद दाराआड विशेष चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले, “साखर संकुलात विविध नेत्यांसोबत चर्चा सुरू होती. आम्ही एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढवू शकतो, यावरच चर्चा केली. यात लपवण्यासारखे काहीच नाही.”