अमळनेरमध्ये बकरी ईद उत्साहात साजरी; ईदगाह मैदानावर शांततेत सामूहिक नमाजपठण

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर : मुस्लिम धर्मीयांचा त्याग, बलिदान आणि एकतेचे प्रतीक असलेला बकरी ईद (ईद-उल-अजहा) शनिवार, ७ जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७.३० वाजता शहरातील ईदगाह मैदानावर शहर-ए-खतीब नवशाद आलम यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नमाजपठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

या पवित्र दिवशी नमाजपठणानंतर कुर्बानी (बलिदान) अर्पण करण्यात आली. ईदगाह मैदानावर वुजू साठी पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. देशात शांतता आणि सौहार्द नांदावे, यासाठी विशेष दुआही करण्यात आली.

ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नव्या कपड्यांची खरेदी केली होती, तर लहान मुलांमध्येही ईदचा विशेष उत्साह पाहायला मिळाला. नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छतेची विशेष मोहिम राबवण्यात आली.

शहरातील शहालम नगर, कसाली, बेलदार मोहल्ला, बारी प्लॉट, अंदरपुरा, बाहेरपुरा, इस्लामपूरा, दर्गाह अली, इस्तेमा नगर, खाजा नगर, इमानपुरा, बकरा मार्केट, शाहनूरशा बाबा आदी भागांतील मशिदींमध्येही पारंपरिक पद्धतीने नमाज अदा करण्यात आली. प्रमुख धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली शांततेत नमाजपठण पार पडले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता. डीवायएसपी कोते साहेब, पीआय दत्तात्रेय निकम, तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष लोहरे, नासिर हाजी, शब्बीर पहेलवान, अखलाक भाई, रज्जाक शेख व ईदगाह कब्रस्तान ट्रस्ट तर्फे उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!