श्री गोविंद महाराज भक्तनिवासाच्या ऑनलाईन बुकिंगचा भाविकांच्या सेवेसाठी भावनिक शुभारंभ. -संत सखाराम महाराज संस्थानला Google रेटिंगचा मान, संत प्रसाद महाराजांच्या हस्ते प्रमाणपत्राचे उद्घाटन.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर— संत परंपरेतील निष्ठेचा आणि सेवाभावाचा मूर्तस्वरूप ठरलेले श्री गोविंद महाराज भक्तनिवास या नव्याने उभारलेल्या प्रकल्पाच्या ऑनलाईन बुकिंग प्रणालीचा भावनिक आणि भक्तिपूर्ण शुभारंभ शनिवारी (जेष्ठ शुद्ध एकादशी) सायंकाळी ६ वाजता, वाडी मंदिर परिसरात संपन्न झाला.

श्री सदगुरु सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थान, अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला हा भक्तनिवास केवळ निवासासाठी नसून, श्रद्धाळूंसाठी एक पवित्र आध्यात्मिक केंद्र ठरत आहे. यामध्ये AC व Non-AC रूम्स उपलब्ध असून, अल्पदरात व घरबसल्या बुक करता येण्यासारखी ऑनलाइन सुविधा भाविकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाली आहे.

उद्घाटन समारंभ संत श्री प्रसाद महाराज अमळनेरकर (गादीपती) यांच्या पावन हस्ते पार पडला. यावेळी ट्रस्टी दिलीप बापूसाहेब देशमुख, महेश जोशी, येवले आप्पा, रमेश जोशी, अनिलदादा जोशी, यांच्यासह अनेक सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अद्ययावत ऑनलाईन बुकिंगसाठी वेबसाइट: https://booking.sakharammaharaj.org सुरु करण्यात आली आहे.
भक्तनिवासाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे शांत, सात्विक वातावरण, बोरी नदीकाठी असलेले स्थान आणि समाधी मंदिराच्या पवित्र ऊर्जेच्या सान्निध्यात असलेली वास्तुशुद्धता. हे स्थान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेरच्या आध्यात्मिक प्रवाहात एक नवे केंद्रबिंदू ठरत आहे.
🟨 Google रेटिंगचा सन्मान:
सदगुरु सखाराम महाराज समाधी मंदिरास Google Reviews च्या माध्यमातून अधिकृत रेटिंग प्रमाणपत्र मिळाले असून, या गौरवाचे उद्घाटन संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते झाले. हा सन्मान संस्थेच्या कार्याची, भक्तसेवेची आणि गुणवत्तेची पावती असून, जागतिक स्तरावर संस्थेच्या नावाला मिळालेली एक महत्त्वाची ओळख आहे.
संत प्रसाद महाराज म्हणाले, “ही मान्यता म्हणजे सखाराम महाराजांच्या कृपाशक्तीची साक्ष आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी हे स्थान उर्जेचा अखंड स्रोत ठरेल, असा आमचा विश्वास आहे.”
समाधी मंदिर परिसर, भक्तनिवास सुविधा आणि वाडी क्षेत्रात करण्यात आलेले सातत्यपूर्ण विकासकार्य, यामुळे संस्थेला मिळालेली ही ओळख सर्व सेवेकऱ्यांच्या समर्पित सेवाभावाची फळ आहे.
