पातोंडा खून प्रकरणातील पाचही आरोपी मध्य प्रदेशातून अटकेत; अमळनेर पोलिसांची शिताफीने कारवाई..


आबिद शेख/ अमळनेर
पातोंडा गावच्या शिवारात दिनांक 29 मे 2025 रोजी मध्यरात्री मध्यप्रदेशातील कॉन्ट्रॅक्टर कैलाश प्रजापती (वय 45) याच्यावर हल्ला करून त्याला गंभीर दुखापत करत खून करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यातील पाचही आरोपींना अमळनेर पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. खून करणारे आरोपी पुढीलप्रमाणे आहेत: गोपाल साहूलाल धुर्वे (वय 35) पंकज उमरावसिंग शिलू (वय 27) सलीम निर्मलशहा धुर्वे (वय 22) रोहित बुद्धसिंग शिलू (वय 19) शिवम फुलसिंग शिलू (वय 18)
सर्व आरोपी रा. बिजाढाना, पो. इटावा, ता. तामिया, जि. छिंदवाडा, राज्य मध्यप्रदेश येथील आहेत.

या आरोपींचा शोध घेण्यासाठी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेड कॉन्स्टेबल विजय भोई (3162), पोलीस कॉन्स्टेबल राहुल गोकुळ पाटील (686) व राहुल नारायण पाटील (711) यांनी थेट मध्य प्रदेशमधील अतिशय दुर्गम भागात जाऊन ही धडक कारवाई केली.
या कारवाईत जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयातील मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार गौरव पाटील व मिलिंद जाधव यांचे तांत्रिक सहाय्य अत्यंत मोलाचे ठरले. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी अमळनेरला आणण्यात आले आहे.

या यशस्वी ऑपरेशनमुळे पोलीस दलाचे कौतुक होत आहे. स्थानिक गुन्हेगारी रोखण्यासाठी अशी शिताफीची व तांत्रिक पद्धतीने यशस्वी केलेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.