प्रामाणिकपणाचं जिवंत उदाहरण! दहा लाखांचे दागिने परत करणाऱ्या अमीन शेख यांचा कौतुकास्पद सन्मान..

24 प्राईम न्यूज 11 Jun 2025

शहादा शहरातील विकास हायस्कूलजवळ घडलेली एक हृदयस्पर्शी घटना आज चर्चेचा विषय बनली आहे. गरीब नवाज कॉलनीत राहणारे अमीन शेख हे रोजप्रमाणे विकास हायस्कूल परिसरात भंगार गोळा करत होते. त्याच दरम्यान श्री. राजपूत सर यांनी त्यांच्या घरातील काही भंगार आणि रद्दी दिली.

परंतु त्या रद्दीमध्ये चुकून सुमारे दहा लाख रुपये किमतीचे दागिने आले होते. ही बाब अमीन शेख यांच्या लक्षात आली असता त्यांनी एक क्षणही न दवडता हे दागिने राजपूत सरांना परत केले.
विशेष म्हणजे अमीन शेख यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तरीसुद्धा एवढ्या मोठ्या किमतीचे दागिने परत करून त्यांनी प्रामाणिकपणाचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
आजच्या भौतिक युगात अशा प्रकारची नितीमूल्य जपणारी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत. अमीन शेख यांचे जितके कौतुक केले जाईल तितके कमीच आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाला समाजाकडून मानाचा मुजरा दिला जात आहे.
🔹 या घटनेवरून स्पष्ट होते की, अजूनही समाजात प्रामाणिक लोक आहेत, जे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सत्य आणि नितीमूल्यांना महत्त्व देतात.