दारू महागली! ‘लाडक्या बहिणी’साठी सरकारचा मद्यपींच्या खिशावर गदा..

24 प्राईम न्यूज 11 Jun 2025

— ‘लाडक्या बहिणी’च्या योजनांसाठी निधी उभारण्याच्या प्रयत्नात राज्य सरकारने मद्यावरील राज्य उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशी, विदेशी आणि भारतीय बनावटीच्या मद्यावर दरवाढ होणार असून तळीरामांना आता एक घोट अधिक महागात मिळणार आहे.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या करवाढीला मंजुरी देण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सरकारला सुमारे १४,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे.
जुने दर (प्रतिलिटर):
देशी मद्य – ₹७०
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य – ₹१२०
विदेशी मद्य – ₹२१०
नवीन दर (प्रतिलिटर):
देशी मद्य – ₹८०
महाराष्ट्र मेड लिकर (नवीन) – ₹१४८
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य – ₹२०५
विदेशी प्रीमियम ब्रँड – ₹३६०
महाराष्ट्र मेड लिकर (एमएमएल) – नव्या प्रकाराला हिरवा कंदील
राज्यातील उत्पादकांसाठी ‘महाराष्ट्र मेड लिकर’ (एमएमएल) या नवीन धान्याधारित विदेशी मद्य प्रकारास सरकारने मान्यता दिली आहे. केवळ महाराष्ट्रातील उत्पादकांनाच हे उत्पादन करता येणार असून, त्यासाठी स्वतंत्र नोंदणी आवश्यक आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूल वाढविण्यासाठी सचिवस्तरीय अभ्यासगट स्थापन केला होता. या गटाने तेलंगणा, मध्य प्रदेशसारख्या राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करून ही करवाढ सुचवली आहे.
सरकारसमोर सध्या विविध जाहीर योजनांसाठी निधी उभारण्याचं आव्हान असून, महसूल वाढवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.