स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा : नगरविकास विभागाकडून प्रभाग रचनेचे आदेश जारी..

आबिद शेख/अमळनेर

साडेतीन वर्षांनंतर अखेर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांच्या प्रभाग रचनेसाठी नगरविकास विभागाने मंगळवारी अधिकृत आदेश जारी केले आहेत. विशेष म्हणजे, यावेळी प्रभाग रचनेसाठी गुगल मॅपचा आधार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईसाठी विशेष समिती
मुंबई महापालिकेसाठी २२७ प्रभागांनुसार नव्याने रचना करण्यात येणार असून, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाणे, नाशिकसह ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गातील महापालिकांमध्ये चार सदस्यीय समिती प्रभाग रचना करणार आहे.
२०२२ पासून प्रशासकीय राजवट
८ मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. मात्र ६ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून, नगरविकास विभागाला तातडीने प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले होते.
अडीच महिन्यांत प्रभाग रचना पूर्ण
प्रभाग रचनेसाठी अंदाजे अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. मुंबईसाठी महापालिका आयुक्त तर इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी त्यावर सुनावणी घेणार आहेत. अंतिम प्रभाग रचना यादी निवडणूक आयोगाला सादर करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.