वावडे येथे काका-पुतण्यात हाणामारी – पुतण्याचा हात मोडला..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर तालुक्यातील वावडे येथे काका-पुतण्यात झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना ७ जून रोजी घडली. या घटनेत पुतण्याला सहा जणांनी मारहाण केली असून, त्याचा उजवा हात मोडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वावडे येथील नरेंद्र भीमराव वानखेडे (वय ३०) हा ७ जून रोजी आपल्या शेतात कपाशीला पाणी देत असताना, बाजूच्या शेतात काम करणारे त्याचे काका शिवाजी विठ्ठल पाटील यांनी मोटरचा फ्यूज काढून घेतला. नरेंद्रने याबाबत विचारणा केली असता त्यांच्यात वाद झाला. त्यातून बाचाबाची होऊन शिवीगाळ सुरू झाली.
यानंतर बाजूच्या शेतात काम करणारे नरेंद्रचे नातेवाईक – काकू सुलाबाई शिवाजी पाटील, दुसरे काका गुलाब विठ्ठल पाटील, चुलत भाऊ ज्ञानेश्वर गुलाब पाटील, त्याची पत्नी आशाबाई ज्ञानेश्वर पाटील, आणि पुतण्या प्रतीक ज्ञानेश्वर पाटील – यांनी एकत्र येऊन नरेंद्रला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, काठी व लोखंडी रॉडने मारहाण केली.
शेवटी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी हस्तक्षेप करून नरेंद्रची सुटका केली. या मारहाणीत नरेंद्रच्या उजव्या हाताला जबर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले असून, तो सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.