शिव शक्ती चौकातील कचराकुंडी बनली डंपिंग ग्राउंड; नागरिक त्रस्त..

आबिद शेख/अमळनेर. -अमळनेर येथिल न्यु लक्ष्मी टॉकीजच्या मागे, शिव शक्ती चौक परिसरातील कचराकुंडी अनेक दिवसांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहे या ठिकाणी महानगरपालिकेची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेचे कर्मचारी अनेकदा दोन-दोन दिवस या भागात फिरकत सुद्धा नाहीत. त्यामुळे कचराकुंडी तुडुंब भरून वाहू लागते आणि आजूबाजूला कचरा पसरतो. यामुळे घाण व दुर्गंधी वाढली असून परिसरात मोकाट कुत्री आणि जनावरे कायमस्वरूपी वावरताना दिसत आहेत.
या सर्व परिस्थितीचा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो आहे. लहान मुलं, वृद्ध आणि महिला यांना या दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही, अशी तक्रारही काही रहिवाशांनी व्यक्त केली.
या समस्येकडे पालिकेने तातडीने लक्ष देऊन नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून जोर धरत आहे.