ड्रेनेज समस्येमुळे नागरिक त्रस्त; 2011 पासून प्रलंबित कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गवा पार्क परिसरातील ड्रेनेज कामाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. वॉर्ड क्रमांक 28 मधील या भागात 2011 पासून ड्रेनेजची समस्या गंभीर असून, यामुळे पावसाळ्यात पाणी साचते, सांडपाण्याचा निचरा होत नाही आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
स्थानिक रहिवासी विश्वप्रताप मित्तल, पुनम विजय पाटील, राजेंद्र नामदेव पाटील यांच्यासह इतरांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून देखील हे काम केवळ आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिले आहे. ड्रेनेजचे काम योग्य पद्धतीने न झाल्याने शोषखड्डे वरच्यावरच आहेत आणि व्यवस्थापनही योग्य नाही.
ताज्या माहितीनुसार, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन ते तीन दिवसांत काम सुरू करण्याचे सांगितले होते, मात्र अद्याप पत्रव्यवहारही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
स्थानिकांनी पालिकेच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “जर तातडीने काम सुरू झाले नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल,” असा इशारा दिला आहे.