समाधान मैराळे यांना दिल्लीत मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान.

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : येथील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते समाधान एकनाथ मैराळे यांना दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी, हरियाणा यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
ही मानद पदवी देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिली जाते. मागील महिन्यात या विद्यापीठाने अशा व्यक्तींकडून प्रस्ताव मागवले होते, त्यानुसार निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील केवळ दोन जणांची निवड झाली होती, ज्यात अमळनेरचे समाधान मैराळे यांचा समावेश होता.
दिनांक १४ जून रोजी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात देशभरातील एकूण ३८ मान्यवरांना ही पदवी प्रदान करण्यात आली. सुप्रीम कोर्टाचे वकील डॉ. राम अवतार शर्मा आणि दिल्ली पोलिस अधिकारी किरण सेठी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या सन्मानानंतर समाधान मैराळे यांच्यावर विविध सामाजिक, पत्रकारितेतील आणि स्थानिक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.