देशात जातीवर आधारित जनगणनेची अधिकृत घोषणा; २०२७ पासून दोन टप्प्यांत होणार जनगणना.

24 प्राईम न्यूज 17 Jun 2025

नवी दिल्ली गेल्या जवळपास चार वर्षांपासून रखडलेली जनगणना अखेर पुढील वर्षीपासून पार पाडली जाणार असून, केंद्र सरकारने सोमवारी याबाबतची अधिसूचना जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत जाहीर केली. विशेष म्हणजे, यंदाची जनगणना दोन टप्प्यांत होणार असून ती जातीवर आधारित असेल. यामध्ये नागरिकांची सामाजिक व आर्थिक माहिती गोळा करण्यात येणार आहे.
पहिला टप्पा लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरु होईल, तर दुसरा टप्पा उर्वरित भारतात १ मार्च २०२७ पासून राबवण्यात येईल. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून होणार आहे. यासाठी सुमारे ३५ लाख कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील.
या जनगणनेत नागरिकांना ३० हून अधिक प्रश्न विचारले जाणार असून त्यामध्ये नाव, लिंग, वय, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती, कुटुंब प्रमुखाशी असलेले नाते, धर्म, जात, उपजात, शिक्षण, रोजगार, प्रवास, कौटुंबिक रचना यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, घराची स्थिती, मालकी हक्क, घर पक्के आहे का याचीही नोंद घेतली जाणार आहे.
ही जनगणना २०२८ मध्ये होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेसाठी एक महत्त्वाची पायाभरणी ठरणार आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षित जागांची नव्याने आखणी केली जाणार असून, महिला आरक्षणासह सामाजिक आरक्षणाचा मार्गही या जनगणनेच्या आधारे निश्चित होणार आहे.