साने गुरुजी बालवाडी विभागात विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी उमटविला ठसा..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – “सुट्टीचा मेवा खाऊन आज शाळेचा आत्मा परतला आहे, त्यांच्याच किलबिलाटाने बालवाडी बहरली आहे…” अशा उत्साहपूर्ण वातावरणात अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी बालवाडी विभागात शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस दि. 16 जून रोजी अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील पहिल्या पावलांचे स्वागत पालकांच्या हस्ते औक्षण करून, फुलांचा वर्षाव करत, रंगीबेरंगी रंगांनी त्यांच्या नाजूक हातांचे ठसे कोऱ्या कागदावर उमटवून अत्यंत कल्पकतेने करण्यात आले. शाळेच्या या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पेढ्याचा खाऊ देण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव अॅड. बाविस्कर, संचालक मगन पाटील, भास्कर बोरसे, किरण पाटील, तसेच साने गुरुजी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, साने गुरुजी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक संजीव पाटील व बालवाडीच्या मुख्याध्यापिका सौ. महाजन यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी मगन पाटील यांनी पालकांना सुसंस्कारित विद्यार्थ्यांचे महत्त्व विशद केले. संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी शिक्षक आणि पालक यांच्या संयुक्त सहकार्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याचे प्रभावी विवेचन केले.
सूत्रसंचालन सौ. लतिका शिंगाने यांनी केले. पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेचा पहिला दिवस आनंदात, उत्साहात आणि संस्मरणीय क्षणांनी सजलेला ठरला.