प्रताप मिल कॉलनीतून वळवलेली ट्रॅफिक नागरिकांसाठी त्रासदायक..

अतिरिक्त जड वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने वळवावी – संतप्त नागरिकांची प्रशासनाकडे मागणी
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – सा.बां. विभागाने वळण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचे कारण पुढे करून गेले महिनाभर प्रताप मिल कॉलनीतील चिंचोळ्या रस्त्याने हायवेची ट्रॅफिक वळवली आहे. परिणामी, या रस्त्यावरून दररोज रात्री अवजड वाहनांची अखंड वाहतूक होत असून स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, खड्डा बुजविण्याचे काम सुरळीतपणे सुरू ठेवावे, त्याविषयी काही हरकत नाही. मात्र तोपर्यंत अतिरिक्त ट्रॅफिकसाठी उड्डाणपुलाचा मार्ग किंवा जुन्या गलवाडे रस्त्याचा पर्याय वापरावा. या रस्त्यावरील भार कमी करावा, अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे.
तहसीलदार श्री. सुराणा यांचाही शासकीय वाहनाने ये-जा याच रस्त्यावरून होतो. त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेऊन या समस्येवर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच पोलीस विभाग, सा.बां. विभाग आणि नगरपालिका यांनीही यात लक्ष घालून तत्काळ उपाययोजना कराव्यात.
स्थानिक आमदार आ. अनिलदादा पाटील यांनीही या प्रश्नात लक्ष घालून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.