चिमणपुरी पिंपळे येथे शेतकऱ्यांना अनुदानित मुग बियाण्यांचे वाटप; 25 शेतकऱ्यांना लाभ..

आबिद शेख/अमळनेर

पिंपळे ता. अमळनेर येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित मुग पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले. एकूण दहा हेक्टर क्षेत्रासाठी बियाण्यांचे वाटप करण्यात आले असून, 25 शेतकऱ्यांना प्रत्येकी 0.40 गुंठा क्षेत्रासाठी बियाण्यांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी गावातील ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील, सदस्य निंबा बापू चौधरी, भाऊसाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, महिलावर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेती शाळा उपक्रमांतर्गत शेतकरी निवड, बीजप्रक्रिया, माती नमुने, खत व्यवस्थापन याविषयी सहाय्यक कृषी अधिकारी पूनम पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मंडळ कृषी अधिकारी आर.एन. सोनवणे, कृषी अधिकारी प्रफुल पाटील, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे व उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत साठे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्यावर आवश्यक ती बीजप्रक्रिया करावी, पिकांच्या योग्य वाढीसाठी योग्य खत व्यवस्थापन करावे, तसेच सातत्याने निगा राखावी, असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला.