पाडळसरे धरणाचा समावेश पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत खरोखरच झाला आहे का? – डॉ. बी. एस. पाटील यांचा सवाल..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर पाडळसरे धरणाच्या प्रश्नावर विद्यमान खासदार आणि आमदारांकडून ठोस माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी अधिकृत खुलासा करण्याची मागणी केली आहे. सध्या विविध ठिकाणी सन्मान स्वीकारत असलेले लोकप्रतिनिधी या महत्वाच्या विषयावर मौन बाळगत असल्याची टीका त्यांनी केली.
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत पाडळसरे धरणाचा समावेश झाल्याचे सांगितले जात आहे, मात्र यासंबंधी कोणताही अधिकृत आदेश, पी.आय.बी.च्या (PIB) बैठकीतील ठराव किंवा निधीबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. ८५९ कोटी रुपयांचा निधी कुठून, केव्हा आणि कसा मिळणार याबाबत देखील सध्या अंधार आहे, अशी टीका डॉ. पाटील यांनी केली.
“योजनेत समावेश झाला असल्याचा आदेश दाखवा. जनतेसमोर सर्व कागदपत्र सादर करा. अन्यथा यासंबंधी फलक लावून स्वतःची पाठ थोपटणे म्हणजे जनतेला फसवण्याचा प्रकार आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रकरणात पारदर्शकता यावी, लोकांसमोर सत्य मांडले जावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाकडून करण्यात आली आहे.