सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा करणे आता बंद! पुण्यातून महसूल विभागाचा स्पष्ट आदेश..

24 प्राईम न्यूज 26 Jun 2025

— महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागांतर्गत जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य) पुणे यांनी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करत सरकारी कार्यालयात आणि कार्यालयीन वेळेत वैयक्तिक समारंभ साजरे करण्यावर बंदी घातली आहे.
या आदेशात नमूद केलं आहे की, काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयात कामाच्या वेळेत वाढदिवस यांसारखे वैयक्तिक समारंभ साजरे करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होतो आणि नागरिकांना त्यांच्या कामासाठी तिष्ठत बसावे लागते. ही बाब नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या विरोधात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे (भा.प्र.से.) यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ कार्यालयीन वेळेत अथवा कार्यालयात साजरे केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
तसेच याआधी असे समारंभ ज्यांनी केले आहेत, त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी समज देण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत अशा अनुशासनभंग करणाऱ्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्व विभागप्रमुखांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.
.