नशिराबादच्या विद्यार्थ्यांना दिलासा: दाखले न मिळाल्याने निर्माण झालेला अडथळा दूर; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची त्वरित कारवाई.

24 प्राईम न्यूज 26 Jun 2025

नशिराबाद – येथील के.एस.टी. उर्दू हायस्कूलमधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले न मिळाल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला होता. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘एकता संघटना’चे समन्वयक फारुख शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनल करणवाल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली असून, त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती शिक्षणमंत्री, आयुक्त, संचालक, उपसंचालक, मुख्यमंत्री सचिवालय आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना पाठवण्यात आल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी गंभीरतेने दखल घेत तात्काळ शिक्षण विभागाला निर्देश दिले की, विद्यार्थ्यांचे दाखले त्वरित उपलब्ध करून दिले जावेत. त्यांनी आपल्या भ्रमणध्वनीद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधत, शाळेत तीन वरिष्ठ अधिकारी पाठवण्याचे आदेश दिले.
हे अधिकारी म्हणजे – शिक्षण विस्तार अधिकारी सौ. सरला पाटील, उपशिक्षणाधिकारी सौ. रागिणी चव्हाण आणि मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी खलील शेख – हे प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे दाखले वाटप करतील.
फारुख शेख यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना २६ जून रोजी शाळेत जाऊन आपले दाखले घेण्याचे आवाहन केले असून, “दाखले वेळेवर न मिळाल्यास त्वरित संपर्क साधावा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिष्टमंडळात फारुख शेख यांच्यासह अरिफ देशमुख, अनिस शहा, नजमुद्दीन शेख, वासिफ सर, रईस शेख व फुरकान शेख यांचा समावेश होता.