अमळनेरमध्ये झपाट्यानं वाढतेय ‘फ्लॅट संस्कृती’; शहरातील मध्यवर्ती ठिकाणी घरांना वाढती मागणी.

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर शहरात ‘फ्लॅट संस्कृती’ला चांगलाच उतारा मिळतोय. विशेषतः शासकीय व बँक कर्मचारी वर्गाकडून शहराच्या मध्यवर्ती भागात घर घेण्याकडे कल वाढलाय. कार्यालय किंवा बँकेतून मधल्या सुट्टीत घरी जाणं सोयीचं व्हावं, यासाठी घर जवळच असावं, अशी त्यांची प्राथमिकता आहे.
शहरापासून लांब घरं घेतली, तर किरकोळ कामांसाठी — अगदी भाजी खरेदीसाठीसुद्धा — ३ किलोमीटरचा फेरी बाजाराचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे लांबच्या परिसरातील घरांना मागणी घटताना दिसतेय.
नवीन प्रशासकीय कार्यालयं व बस स्थानक परिसरात झपाट्यानं विकसित होत असल्याने या भागातील जमीन दर ३ ते ४ हजार रुपये प्रति स्क्वेअर फूटपर्यंत पोहोचले आहेत. शाळा, कार्यालयं आणि वाहतूक सुविधा जवळ असाव्यात, यासाठी नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागातील फ्लॅट्सला प्राधान्य देत आहेत.
दुसरीकडे, शहरापासून दूर असलेल्या भागांमध्ये चोरीसारख्या घटनांची भीती कायम राहते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही शहरातील फ्लॅट्स सुरक्षित पर्याय मानले जात आहेत.
२४ तास पाणीपुरवठा, सुलभ रस्ते व स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधा हवी असल्याने नवीन पिढी शहरातच स्थायिक होण्याकडे कल दर्शवत आहे. काही बांधकाम व्यावसायिक मात्र अजूनही पक्का रस्ता नसलेल्या, शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर घरं उभारत आहेत. मात्र अशा ठिकाणांची पसंती घटल्याचं एका स्थानिक इस्टेट एजंटने सांगितलं.
त्याच्या मते, मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फ्लॅट्सना मागणी वाढली असून, त्यामुळे अमळनेरमध्ये फ्लॅट संस्कृती झपाट्यानं बळकट होत आहे.