“लोकशाहीचा गळा घोटू नका!” – वाडी चौकवासीयांची प्रशासनाला खुली चेतावणी; चुकीच्या मतदार नोंदींवरून संताप..

0

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील वाडी चौक परिसरातील नागरिकांनी निवडणूक यंत्रणेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, चुकीच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नावे तत्काळ पूर्ववत करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा आगामी निवडणुकीत सामूहिक मतदान बहिष्कार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

वाडी चौक, गुरव गल्ली, भाजी बाजार, पुजारी गल्ली आणि लक्ष्मीपुरा या घनवस्तीत राहणाऱ्या सुमारे 150 मतदारांची नावे चुकीने नदीपलीकडील गायकवाड हायस्कूल (प्रभाग क्रमांक 10) येथील यादीत टाकण्यात आली आहेत. या भागाचा प्रभाग 10 शी कोणताही सामाजिक वा भौगोलिक संबंध नसतानाही नागरिकांना जवळपास दोन किलोमीटर अंतरावर मतदानासाठी जावे लागत आहे.

यामुळे वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. परिणामी, या भागातील मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, वाडी संस्थान परिसरातील मूळ मतदान केंद्र मागील निवडणुकीदरम्यान बांधकामामुळे तात्पुरते माळीवाडा येथील मुंदडा हायस्कूलमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, आता मूळ ठिकाणी बांधकाम पूर्ण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे असूनही, मतदान केंद्र अद्याप पूर्ववत करण्यात आलेले नाही.

स्थानिक नागरिकांनी ठामपणे सांगितले की, “आम्हाला आमच्या परिसरातीलच मतदान केंद्र हवे आहे. नागरिकांच्या सोयीचा आणि हक्काचा विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही मतदानावर सामूहिक बहिष्कार करू.”

नगरपरिषद आणि निवडणूक प्रशासनाने या तक्रारींचे गांभीर्याने संज्ञान घेऊन तत्काळ योग्य ती उपाययोजना करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची जोरदार मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!