रामनगरात पावसाचे गारे – सेंट मेरी स्कूल व्हॅन फसली,; प्रशासनाचं दुर्लक्ष.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – शहरातील रामनगर भागात सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे रस्ता अक्षरशः गारामध्ये बदलला असून, आज सेंट मेरी स्कूलची व्हॅन यामध्ये फसल्याची घटना घडली.
सकाळच्या शाळेच्या वेळेत व्हॅन अडकल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागला. याच भागातून रोज शेकडो मोटरसायकलस्वार ये-जा करतात, मात्र रस्त्यावरील गारामुळे अनेकजण घसरून पडत आहेत.
तथापि, स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. पावसाळा सुरु असतानाही मूलभूत रस्त्यांची डागडुजी न होणे, ही गंभीर बाब मानली जात आहे.
स्थानिक नागरिक आणि पालकवर्गांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.