देवगाव देवळी येथे जि.प.उच्च प्राथमिक शाळेस शॉर्टसर्किटमुळे लागली आग…

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २१ रोजी दुपारी घडली.
२१ रोजी शालेय कामकाज आटोपून सर्व शिक्षक आपल्या घरी गेलेले होते. त्याच वेळी साडेबारा वाजेच्या सुमारास इयत्ता सातवीच्या वर्गातून धूर येत असल्याचे शाळे समोर राहणारे रवींद्र पाटील यांना दिसले. त्यावेळी त्यांनी शाळेकडे धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान साधत अमळनेर पोलीस स्टेशन व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे याना कळवून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे नितीन खैरनार, भिका संदानशिव, मच्छिद्र चौधरी, फारुख शेख यांच्या टीमला पाठविले.गावातील रवींद्र पाटील, सुनील माळी ,आकाश पाटील, उपसरपंच रामकृष्ण पाटील,संदीप शिंदे,पुंडलिक पाटील, पोलीस पाटील अविनाश सैंदाने यांनी आग विझवण्यासाठी सहकार्य केले. गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पंचनामा केला.इयत्ता सातवीच्या वर्ग खोलीतील लॉकर फायबरचे दोन कपाट, एकवीस फायबरचे बेंच,वर्गातील पृथ्वीचे गोल, दोन फुटबॉल, लाकडी बॅट, दोन पंखे, सर्व खिडकी व तावदाने,सातवीचे वर् निपुण चाचणीव संकलित चाचणीच्या उत्तर पत्रिका असे सुमारे साठ हजाराचे साहित्य जळून खाक झाले आहे.
अग्निशमन दलाचे कौतुक !
गेल्या चार पाच घटना भर दुपारी कडक उन्हात घडल्या असून तापमानामुळे अकस्मात आगी लागल्या. बाहेरील तापमान आणि घटनस्थळावरील आगीचे तापमान अशी प्रचंड उष्णता सहन करून अग्निशमन दल वेळीच आग विझवून पुढील होणारे नुकसान टाळत आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.