श्री मोहन महाराज बेलापूरकर यांच्या दिंडीचे अमळनेर जोरदार स्वागत,
गुरु शिष्याची परंपरा आजही कायम..

0

अमळनेर ( प्रतिनिधि ) संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने परंपरेनुसार हभप श्री मोहन महाराज बेलापूरकर यांच्या दिंडीचे शनिवारी रात्री शहराच्या वेशीवर म्हणजेच आर.के.पटेल फॅक्टरी येथे मुक्काम झाल्यानंतर काल 30 रोजी सकाळी 6 वा. सूर्योदयापूर्वी त्यांच्या दिंडीचे शहरात आगमन होऊन परंपरेनुसार जल्लोषात स्वागत करण्यात आले. शेकडो

वर्षानंतरही गुरु शिष्याची ही परंपरा आजही कायम असून या निमित्ताने पांडुरंग श्री बेलापूरकर महाराज यांच्या रूपाने शहरात येत असल्याची भक्तगणांची भावना आहे. दिंडी फॅक्टरीत पोचल्यावर उद्योगपती तथा माजी नगराध्यक्ष, खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक विनोदभैय्या पाटील व परिवाराने त्यांचे परंपरेनुसार स्वागत केले. काल सकाळी प्रसाद महाराज हे बेलापूरकर महाराजांच्या स्वागतासाठी फॅक्टरीत पोहोचल्यावर तेथे बेलापूरकर महाराजांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर बेलापूरकर महाराज हे प्रसाद महाराजांसोबत आर.के.नगरातील गणपती मंदिरात पोहोचले. तेथेही विनोदभैया पाटील व राजवीर अभिषेक पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अनिल जोशी, मिलिंद वैद्य, दिलीप देशमुख, रवींद्र देशमुख, मनोज भंडारकर, उदय देशपांडे, अनिल जोशी यासह असंख्य मान्यवर व भक्तगण उपस्थित होते. यानंतर बेलापूरकर महाराज व प्रसाद महाराज हे एकाच बग्गीत विराजमान होऊन वाजत गाजत शहरात दाखल झाले. दरम्यान बेलापूरकर महाराज यांच्या आगमनानंतर साक्षात पांडुरंग उत्सवासाठी आले अशी भक्तांची श्रद्धा असून त्यांच्या आगमनानंतर खऱ्या अर्थाने उत्सवास सुरुवात झाली आहे. यात्रा उत्सव पूर्ण करून काल्याचे किर्तन करून ही दिंडी पुन्हा परतीच्या वाटेने निघणार आहे.

आदर्श गुरु शिष्याची परंपरा आजही कायम
पांडुरंगाचे नामस्मरण करून संपूर्ण राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकवण्याची परंपरा प्रसाद महाराजांचे शिष्य बेलापूरकर महाराज व त्यांच्या गादीवरील पुरुषांद्वारे अखंडपणे सुरू आहे. गुरु शिष्याची आदर्श परंपरा आजही कायम आहे, त्यात कोणताही बदल आजपर्यंत झालेला नाही. त्यांचे आगमन म्हणजे पंढरीचा पांडुरंग अमळनेर शहरात वास्तव्य करतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे बेलापूरकर महाराजांच्या दिंडीला अनन्य साधारण महत्व आहे. यात्रा उत्सवाच्या काळात बोरी नदीच्या वाळवंटातील संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर बेलापूरकर महाराज दररोज टाळ मृदुंगाच्या गजरात सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत पहारा कीर्तन भजन करतात. संत सखाराम महाराजांप्रमाणे शाहू महाराज हे पांडुरंगाचे भक्त वर्षभरातील 365 दिवसांपैकी दर महिन्याला पांडुरंगाची शुद्ध वारी करीत असतात. ते अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मूळ रहिवासी असल्यामुळे ते बेलापूरकर महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत. श्री संत सखाराम महाराज हे त्यांचे गुरु, त्यामुळे त्यांनी पंढरपूर येथे त्यांच्याकडून अनुग्रह घेतलेला आहे. या परंपरेत गुरूकडून शिष्याला मान सन्मान दिला जातो. दरम्यान श्री लालजी महाराजांच्या रथोत्सवाला व पालखी उत्सव मिरवणुकीच्या पुढे दिंडी काढण्याचा मान बेलापूरकर महाराजांना दिला जातो. पौर्णिमेला गुलालाचा पहिला मानही दिला जातो. यात्रा उत्सवाची सांगता बेलापूरकर महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने होते. त्यानंतर बेलापूरकर महाराजांची दिंडी मार्गस्थ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!