अखेर अमळनेर रेल्वेस्थानकावर आरक्षण अर्ज मराठीतून उपलब्ध..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथील परिसर मराठी बहुल भाषिकांचा असताना रेल्वेस्थानकावर उपलब्ध असणारे रेल्वेचे आरक्षण फॉर्म इंग्रजी, गुजराथी आणि हिंदीमध्ये असल्याने ते बदलवून मराठी भाषेतून करण्यात यावे, अशी मागणी रेल्वेचे माजी झेडआरयूसीसी मेंबर प्रितपालसिंग बग्गा यांनी केली होती. या मागणीला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील देत मराठी भाषेतील फॉर्म उपलब्ध केल्याने प्रवासी बांधवात समाधान व्यक्त होत आहे.
यासंदर्भात १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बग्गा यांनी अमळनेर स्टेशन मास्तर यांना लेखी निवेदन दिले होते व रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील पाठपुरावा केला होता. अधिकारी वर्गास देखील ही मागणी योग्य वाटल्याने त्यांनी मराठीतून आरक्षित अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. रेल्वेच्या इतिहासात अनेक
वर्षानंतर हा बदल झाल्याने प्रवाशांना फॉर्म भरणे सोईचे झाले आहे. निवेदनात बग्गा यांनी म्हटले होते, की अमळनेर स्थानकावर वर्षानुवर्षे रेल्वेचे आरक्षित फॉर्म इंग्रजी, गुजराथी आणि हिंदी आदी भाषांमध्ये उपलब्ध होत आहेत. प्रत्यक्षात सुरत- भुसावळ मार्गावर नवापूर ते पाळधी स्थानकादरम्यान मराठी भाषा वाचू व समजू शकणारे प्रवासी असून, गुजराथी व इंग्रजी भाषा बरेच प्रवासी व कामगार वाचू व समजू शकत नाही. यामुळे आरक्षित अर्ज भरताना त्यांची मोठी अडचण होत असते. आपण महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा केला असताना या दिवसाचे महत्त्व लक्षात घेता कामगार व प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने मराठी भाषेत आरक्षित अर्ज उपलब्ध करावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. योग्य रीतीने पाठपुरावा झाल्याने या मागणीस यश मिळाले आहे.