एरंडोल नजीक पोलिसांच्या
गाडीवर कोसळले झाड : दोन
कर्मचारी ठार, इतर तिघे जखमी..

एरंडोल (प्रतिनिधि) चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे गुन्ह्याच्या तपासासाठी जात असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय वाहनावर झाड कोसळल्याने वाहनातील दोन कर्मचारी ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एरंडोल ते कासोदा दरम्यान अंजनी धरणालगत हा दुर्दैवी अपघात घडला.कासोद्याकडून जळगाव कडे जात असताना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या शासकीय वाहनावर चिंचेचे झाड अचानक पडल्याने गाडीतील सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातिर व चालक अजय चौधरी हे जागीच गतप्राण झाले तर भरत नारायण जठरे, निलेश सूर्यवंशी व चंद्रकांत शिंदे हे जखमी झाले.
सर्व जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, मिलिंद कुमावत, प्रशांत पाटील हे तातडीने घटनास्थळी पोहोचले व स्थानिकांच्या मदतीने जखमी व मृतांना बाहेर काढण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, शैलेश चौधरी, विक्की खोकरे, सिद्धार्थ परदेशी, अमरीश परदेशी यांच्या सह अनेकांनी मदतकार्य केले. आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका तपासासाठी जाऊन परत येताना अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार,
उपविभागीय पोलिस अधिकारी नंदवाळकर यांनी
अपघात स्थळी व ग्रामीण रुग्णालयास भेट दिली.