एरंडोल येथील जि.प. उर्दू मुलींची शाळा कोसळण्याच्या स्थितीत.. -विद्यार्थीनींचा जीव धोक्यात..

सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची शाळा व्यवस्थापन समितीची वरिष्ठांकडे मागणी
एरंडोल ( प्रतिनिधि )येथील जि. प. उर्दू मुलींच्या दुमजली शाळेचा पश्चिमेकडील मागील भागाचे भरावाचे खोदकाम झाल्यामुळे शाळेच्या पायाची माती प्रचंड प्रमाणात घसरत आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतीस गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण झाला असून शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थीनींचा जीव धोक्यात आला आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन समितीकडून वरिष्ठांकडे सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की एरंडोल येथे गढी भागावर सन 2004-2005 वर्षी सिटी सर्वे नंबर 703 या जागेवर सर्व शिक्षा अभियानांतर्गत जि. प. मार्फत उर्दू मुलींची शाळा पश्चिमेकडून 15 फूट जागा सोडून बांधण्यात आली. या शाळेच्या पश्चिमेकडे सिटी सर्वे नंबर 703-सी, 703-डी, 703-इ या खाजगी जागा आहेत. या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली होती. जागेच्या मालकाने अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने काढल्यामुळे सदर शाळेचा पश्चिमेकडील पायाची माती घसरत असल्याने पाया पोखरला जात आहे. याबाबत जागा मालकाने इमारतीच्या सुरक्षिततेसाठी पश्चिमेकडे भिंत बांधण्याचे आश्वासन दिले होते परंतु आतापर्यंत भिंत बांधून दिलेली नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकारी यांचेकडे दिनांक 17/11/2022 रोजी शाळेच्या सुरक्षिततेविषयी उपायोजना करण्याची मागणी केलेली होती परंतु अद्यापपावतो कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने मुलींच्या जीवाविषयी पालकांमध्ये भीतीचे वातावर निर्माण झाले आहे. उपाययोजना त्वरित करून पालकांचे भीतीचे वातावरण दूर करावे अशी मागणी होत आहे.