जयंत पाटील यांच्या कोपरखळीने सभागृहात एकच हशा पिकला..

24 प्राईम न्यूज 18 jul 2023 राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. यंदाच्या अधिवेशनात सत्ताधारी आघाडी मजबूत तर विरोधी आघाडी कमकुवत दिसत आहे. कारण शिवसेना व राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. या अधिवेशनात पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट समोरासमोर आले आहेत. दोन्ही पक्षातील काही आमदार सत्ताधारी बाकांवर तर काही विरोधी बाकावर आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अजित पवारांसह नऊ मंत्री सरकारमध्ये सामील झाले. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा परिचय करून देत असताना मजेशीर गोष्ट घडली.
अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांना नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय करण्यास सांगितले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहून नव्या मंत्र्यांची नावे आणि त्यांच्या खात्याची माहिती सभागृहाला देत होते. एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचा परिचय करून देताना उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री म्हटले.
मुख्यमंत्र्यांनी परिचय करून देताच अजित पवारांनी उभे राहून सगळ्यांना नमस्कार केला. अजित पवार बसत असतानाच समोर विरोधी बाकांवर बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मिश्किलपणे त्यांची आमची जुनी ओळख आहे महणत कमेंट केली आहे. जयंत पाटलांच्या टिप्पणीने सभागृहात एकच हशा पिकला.