भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री होणारच! प्रफुल्ल पटेल यांचा विश्वास….

24 प्राईम न्यूज 28 Jul 2023 अजित पवार हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि वजनदार नेते आहेत. त्यामुळे ते भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी व्यक्त केला. त्यामुळे पुन्हा राज्य सरकारमधील नेतृत्व बदलाच्या चर्चेला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने राज्यात लवकरच नेतृत्व बदल होऊन एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने या चर्चेने जोर पकडला होता. शिवाय कॉंग्रेसचे नेते १० ऑगस्टनंतर एकनाथ शिंदे अपात्र ठरणार असल्याचा दावा करीत होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदात बदल होणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते. तरीही प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आशावाद व्यक्त केला.