गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा.. -पाचोऱ्यातील गुंडगिरी विरोधात पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना बुधवारी नगरपालिकेसमोर काही व्यक्तींनी अमानुष मारहाण केली. त्यांना करण्यात आलेली मारहाण हि पत्रकारिता क्षेत्राला काळिमा फासणारी घटना असून गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना याचा तीव्र शब्दांत निषेध व्यत्क्त करीत आहे. संदीप महाजन यांच्यावर झालेला मारहाणीचा प्रकार निंदनीय असून अशाप्रकारे मारहाण करून गुंडगिरीचे समर्थन करणाऱ्या या तथाकथित गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच संदीप महाजन आणि त्यांच्या कुटुंबियाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन गुरुवारी १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

संदीप महाजन हे पाचोरा शहरात पत्रकारिता करतात. त्यांच्या परिवारासह पाचोरा शहरात राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात एक वृत्त प्रसारित केले होते. त्यावेळी किशोर पाटील यांनी वाईट वाटून त्यांना फोन करून शिवीगाळ करीत धमकी दिली होती. तसेच शिवीगाळ केल्याबद्दल त्यांनी माध्यमांच्या समोर कबूलही केले होते. या घटनेनंतर मात्र पाचोरा शहरात संमिश्र पडसाद उमटले होते. संदीप महाजन यांनी पोलिसांकडे पोलीस संरक्षणाची मागणी करत आमदार किशोर पाटील यांच्यापासून स्वतःला व कुटुंबीयांना धोका असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारे संरक्षण देण्यात आले नव्हते.

बुधवारी ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते रेल्वेच्या आंदोलनाची बातमी घेऊन त्यांच्या घरी जात असताना महानगरपालिकेसमोर अज्ञात गुंडांनी त्यांच्या तोंडावर रुमाल फेकत दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर चार ते पाच गुंडांनी लाथा बुक्क्यांनी तुडवत त्यांना बेदम मारहाण केली. आमच्या किशोर आप्पाच्या नादी यापुढे लागलास तर याद राख अशी धमकी त्यांना गुंडांनी दिली. या घटनेनंतर घाबरून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

“मी स्वतः पोलीस अधीक्षकांशी बोलतो. घटनेतील गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत सूचना देतो. पत्रकारांवर अन्याय होणार नाही” या शब्दात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली. निवेदन देताना नरेंद्र कदम, सुमित देशमुख, हेमंत पाटील, विजय वाघमारे, ललित खरे, भगवान सोनार, रजनीकांत पाटील, कमलेश देवरे, अमोल कोल्हे, योगेश चौधरी, वाल्मिक जोशी, वर्धमान जैन, विश्वजीत चौधरी, काशिनाथ चव्हाण, शाळीग्राम पवार, नाजनीन शेख, संधींपाल वानखेडे, नितीन नांदुरकर, विजय पाटील, धर्मेंद्र राजपूत, वाहिद काकर, सागर चौधरी, हेमंत ई. पाटील, अयाज मोहसीन, अस्लम खान, किशोर शिंपी, राहुल शिरसाळे, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!