मांडल येथे चोरट्यानची जबरी चोरी सुमारे १ लाख ८२ हजाराचा ऐवज लंपास…

0

अमळनेर ( प्रतिनिधि ) तालुक्यातील मांडळ येथे अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्स दुकान, किराणा दुकानासह रेशन दुकान फोडून सुमारे १ लाख ८२ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना दिनांक १० रोजी रात्री घडली आहे.
दिनांक ११ रोजी पहाटे तालुक्यातील मांडळ येथे गावातील दत्तात्रय ज्वेलरी शॉपचे शटर उघडले दिसल्याने दुकान फोडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी दुकान मालक अमोल अहिरराव यांना कळविले. त्यावेळी त्यांनी दुकानात धाव घेतली असता ड्रॉवर मधून ११ ग्रॅम सोन्याची माळ, ३ ग्रॅम सोन्याचे मणी, ४०० ग्रॅम चांदी, दोन हजार रुपये रोख असा ७८ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचे लक्षात आले. गावातील निलेश दिलीप पाटील यांच्या सातबारा ॲग्रो एजन्सी मधून ३२ हजार किमतीचे लॅपटॉप, व ३० हजार रुपये रोख असा मुद्देमाल तसेच संजय महादू कोळी यांच्या किराणा दुकानातून पंधरा हजार रुपये रोख, महेश जैन यांच्या किराणा दुकानातून २५ हजार रुपये रोख, वाल्मीक नत्थु पाटील यांच्या रेशन दुकानातून ५० किलो ज्वारी, व दोन हजार रुपये रोख असा मुद्देमाल एकूण एक लाख ८२ हजार पाचशे रुपये किमतीचा लंपास केला आहे. तसेच गावात इतर दोन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाला आहे मात्र काहीच हाती लागली नसल्याने पोलिसांत फिर्याद देण्यात आलेली नाही. दुकाने फोडल्याचे वृत्त समजताच डीवायएसपी सुनील नंदवाळकर, सपोनि शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिसांनी भेट दिली. सकाळी गावभर चर्चा झाल्यानंतर एकाने सांगितले की मी लघुशंकेला उठलो तेव्हा एक चारचाकी आणि त्यात काही तरुण बसलेले होते. मात्र गावातील काही तरुण असावेत म्हणून दुर्लक्ष केले होते. चोरट्यानी मांडळ येथे विविध गल्ल्यांमध्ये या चोऱ्या केल्या आहेत. एका घरात विजेचे दिवे सुरू असल्याने चोरीचे बिंग फुटून पकडले जाऊ नये म्हणून चोरटयांनी त्या घराला बाहेरून कडी लावत इतरत्र चोरी केली. याप्रकरणी जळगाव येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पी एन पाटील, हेडकॉन्स्टेबल चौधरी आदीसह ठसे तज्ञ पथक पाचारण करण्यात आले होते. दुकांनामधील विविध वस्तू वरील ठश्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.

वावडेजवळ सापडली नाशिक पासिंग असलेली निवावी इंडिका गाडी…
दरम्यान वावडे गावाजवळ काल एमएच १४ डीएक्स २५६३ क्रमांकाची निनावी इंडिका गाडी आढळून आली आहे. ह्या इंडिका गाडीतून चोरटे आले मात्र इंडिकामधील डिझेल संपल्याने ती गाडी तेथेच सोडत चोरट्यांनी वावडे येथून बोलेरो गाडी चोरुन मांडळ येथे चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!