मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; शरद पवारांना थेट आव्हान ?

24 प्राईम न्यूज 30 Aug 2023 राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण ? हा वाद आता थेट निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. अजित पवार गटानं पक्षावर व निवडणूक चिन्हावर दावा सांगितल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदही आमच्याकडे असल्याची भूमिका अजित पवार गटानं घेतली आहे. त्याचवेळी समोरून शरद पवार यांनी आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याची भूमिका मांडली आहेत्यामुळे दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात असताना आता खुद्द अजित पवारांनीच आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं विधान केलं आहे. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात बोलताना पक्षाच्या सर्व ५३ आमदारांनी शरद पवारांना सरकारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात पत्र दिलं होतं, असं विधान केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी त्यांनी पत्र दिलं होतं, पण त्यावर चर्चा झाली होती, निर्णय नाही. चर्चा आणि निर्णय यात फरक आहे. जयंत पाटील पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. यासंदर्भातला निर्णय आमच्याकडून होईल, अशा आशयाचं विधान केलं होतं.