भारतीय आघाडीकडे पंतप्रधानपदाचे अनेक उमेदवार आहेत, पण…’, भाजपकडे कोणता पर्याय.

24 प्राईम न्यूज 31 Aug 2023 इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी अनेक चेहरे आहेत. भाजपकडे कोणता पर्याय आहे, हे त्यांनी सांगावे. जो आहे त्याने दहा वर्षांत काय केले. कर्नाटकात तर बजरंगबलीला आणूनही काहीच फायदा झाला नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. विचारधारा वेगवेगळी असली तरी इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. देश आणि संविधानाची रक्षा करणे, हुकुमशाहीला घालविणे, हे आमचे लक्ष्य आहे. लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत व राहू. भारतमातेच्या हातात कोणत्याही हुकुमशहाला बेड्या घालू देणार नाही, असेही ते म्हणाले.राष्ट्रीय पातळीवर भाजपाप्रणित रालोआ विरोधात इंडिया आघाडीची एकजूट होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत या आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून इंडिया आघाडीची पुढील रणनीती या बैठकीत ठरणार आहे. याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, शेकाप नेते जयंत पाटील आदी प्रमुख नेते या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.