जरांगे – पाटलांनी सोडले औषध, पाणी पुढील दिशेबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय.

24 प्राईम न्यूज 12 Sep 2023
सरकारकडून आमच्या मागणीबाबत कोणताच सकारात्मक तोडगा काढला जात नाही. त्यामुळे आता मला औषध, पाणीसुद्धा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. सरकारने नुसतीच चर्चा केली. शिष्टमंडळे पाठवली आणि बोलावली. मात्र, निर्णय काहीच केला नाही, असे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यांचा उपोषणाचा सोमवारी १४ वा दिवस आहे.
जरांगे पाटील म्हणाले, “सरकारने मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावीत आणि सर्व मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करावे. त्यासाठी जुन्या पुराव्यांची अट ठेवू नये, अशी आमची सरळ मागणी आहे. यात कोणताही बदल होणार नाही. सरकारने असा जीआर काढला तर एक महिना काय आम्ही दोन महिने थांबायला तयार आहोत,” असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारला दिलेली वेळ संपली असून उद्यापासून सलाईन काढली जाणार, औषधे बंद, पाणीही बंद केले जाईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता.